आज २३ जुलै २०२१, म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस !! त्यानिमित्त ह्या ब्लॉगमधील ४ थे अनुभवपुष्प सद्गुरू अनिरुद्धबापूंच्या चरणी अर्पण करायला आनंद वाटतोय.....🙏
______________________________________________________________________
ही सत्यघटना साधारण २१ वर्षांपूर्वीची असावी. जेव्हा प. पू. अनिरुद्धबापूंनी आमच्या घरात अनुभवांची एक मालिकाच लावली होती. त्या मालिकेतीलच हे एक पुष्प !!. गणपती उत्सवाचे दिवस होते. दर वर्षी गणेशोत्सवात आमचे त्या वेळचे गायनातील गुरुजी कै. विनायकबुवा काळे यांच्याकडे सकाळी एक गाण्याची बैठक होत असे. साधारण पन्नासएक विद्यार्थी बसतील असा त्यांच्या घरातील हॉल होता. गणपती बेडरूममध्ये बसविलेला असे. बेडरुमही प्रशस्थच होती. एका वर्षी अशीच सकाळी ८ ची बैठक होती. एकेक विद्यार्थी यायला सुरवात झाली. घरी आलेला प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैफिलीच्या आधी आतमध्ये जाऊन श्री गणेशाचे दर्शन घेऊन बाहेरील बैठकीत स्थानापन्न होत असे. मी देखील ह्या शिरस्त्याप्रमाणे आल्याबरोबर आधी गणपतीचे दर्शन घेतले. गुरुजींनी पहाटे ५ वाजताच उठून जास्वंदीच्या लाल चुट्टुक फुलांनी गणपतीची अतिशय सुंदर पूजा केली होती. त्यासोबत डाके सुगंधी कंपनीच्या उदबत्तीचा सुगंध आसमंतात दरवळत होता. सगळ्या खोलीत मांगल्य नुसते भरून राहिले होते. सुंदर पूजा बघून आपोआपच माझे हात जोडले गेले. गणरायाच्या समोर हात जोडल्यावर मन एकचित्त व्हायला वेळ लागत नाही. पण त्याबरोबर आणखी कसली तरी आठवण प्रकर्षाने झाली. ... ती माझ्या आजोळची !! (दर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही दोघं भावंडे एक महिन्यासाठी आजोळी जायचो. तेव्हा आमचे आजोबा (म्हणजे माझ्या आईचे काका) अशीच साग्रसंगीत पद्धतीने घरातील देवांची पूजा करीत. किंबहुना त्या आधी आमच्या हातात एक परडी देऊन बाहेरील अंगणातील जास्वंदीची, चाफ्याची फुले काढायला सांगत. फुले भरलेली परडी घेऊन आम्ही देव्हाऱ्याजवळ मग आजोबांची वाट बघत बसायचो. स्नान केल्यावर मग येऊन आजोबा यथासांग पूजा करीत). असो !! ही आठवण अजूनही मनात ताजीच होती. आज गुरुजींनी केलेली पूजा बघून माझ्या उगीचच नुसते मनात येऊन गेले कि आपल्याला पण अशी जास्वंदीची फुलं मिळाली, तर काय बहार येईल नाही रोजची नित्यपूजा करायला ?? हा विचार मनांत आला आणि पुन्हा नेणिवेतही गेला. आपल्या मनात अनेक कल्प विकल्प येत असतात. ते काही आपण धरून ठेवत नाही. मी गुरुकन्येकडून तीर्थप्रसाद घेतल्यावर बाहेर बैठकीत येऊन शरिक झालो. मैफिल छानच झाली. नेहमीप्रमाणे सुरांनी भारलेल्या अवस्थेत मी घरी गेलो.
दुसऱ्या दिवशी सकाळी ठीक ८ वाजता दरवाज्याची बेल वाजली. मला आश्चर्य वाटले. कारण एव्हढ्या लवकर आमच्याकडे कोण येणार ..?? मीच दार उघडले, तर दरवाज्यात आमच्याच बिल्डिंग मध्ये राहणारी माझ्या मित्राची १०-१२ वर्षाची मुलगी उभी होती. तिचे उदगार पुढीलप्रमाणे होते ..." विकासकाका, हे घे मी तुझ्यासाठी जास्वंदीचे फुल आणलंय......!! ". माय गॉड .........माझ्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला !! मी काय समजायचे ते समजलो......
मुक्त चिंतन ....
१) वास्तविक माझ्या मनात आलेला जास्वंदीच्या फुलाविषयीचा विचार मी घरीही कुणाला सांगितलं नव्हता. अगदी पत्नीलाही नाही. पण देहरूपी मंदिरातील देवाने तो ऐकला असावा का..? ह्याची प्रचिती मला दुसऱ्याच दिवशी आली.
२) त्या देवानेच नेहाला दुसऱ्या दिवशी जास्वदांचे फुल मला देण्याचं बुद्धिस्फुरण दिलं का ?? एव्हढेच नव्हे, तर आमच्या सोसायटीतच झाडे लावली आहेत, त्यामध्ये जास्वंदीही झाड आहे, जिथून नेहाने ते फुल माझ्यापर्यंत कुणीही न सांगता पोहोचविले.
३) जास्वदांचे फुल हवे असण्याचा माझा हेतू सात्विक असल्यानेच देवाने पुढे बाकीची प्यादी हलविली असावीत. देवाच्या Networking ला तोड नाही.
४) ह्यामध्ये मला एक मोठ्ठा संदेशही बापूंनी दिला कि पूजा करण्यासाठी लागणारा भाव पवित्र असेल, तर त्याला लागणाऱ्या पूजेच्या साहित्याची कधीच कमी पडत नाही. आणि समजा कमतरता पडली, तरी आपला पवित्र भाव देवापर्यंत पोचलेलाच असतो. जया मनी जैसा भाव, तया तैसा अनुभव !!
II श्रीराम अंबज्ञ नाथसंविध II

Bapu ch sagle kahi purvat rahatat Kadhich kahi kami padu det nahi
ReplyDeleteManat vichar aan na re hi Bapu ani
toh vichar Purnatwala nenare hi Bapu ch
Nirmal Man ani Shuddha Bhav
Bhava cha bhukela Dev ase mhantat
Mala tar vat te ki Bhav Utppana hi Bapu ch kartat aaple Laad karnya sathi ani toh Bhav poorna hi kartat
mazya Bapu che Prem tar Labhevin Prem
Bapu che Prem sarva na milave hi Prarthana
Shreeram
Ambadnya
Nathsamvidh
अंबज्ञ !!
Deleteसुंदर !!
ReplyDeleteThank you Medha !!
Delete