जया मनी जैसा भाव .... !! आज २३ जुलै २०२१, म्हणजे गुरुपौर्णिमेचा दिवस !! त्यानिमित्त ह्या ब्लॉगमधील ४ थे अनुभवपुष्प सद्गुरू अनिरुद्धबापूंच्या चरणी अर्पण करायला आनंद वाटतोय..... 🙏 ______________________________________________________________________ ही सत्यघटना साधारण २१ वर्षांपूर्वीची असावी. जेव्हा प. पू. अनिरुद्धबापूंनी आमच्या घरात अनुभवांची एक मालिकाच लावली होती. त्या मालिकेतीलच हे एक पुष्प !!. गणपती उत्सवाचे दिवस होते. दर वर्षी गणेशोत्सवात आमचे त्या वेळचे गायनातील गुरुजी कै. विनायकबुवा काळे यांच्याकडे सकाळी एक गाण्याची बैठक होत असे. साधारण पन्नासएक विद्यार्थी बसतील असा त्यांच्या घरातील हॉल होता. गणपती बेडरूममध्ये बसविलेला असे. बेडरुमही प्रशस्थच होती. एका वर्षी अशीच सकाळी ८ ची बैठक होती. एकेक विद्यार्थी यायला सुरवात झाली. घरी आलेला प्रत्येक विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैफिलीच्या आधी आतमध्ये जाऊन श्री गणेशा चे दर्शन घेऊन बाहेरील बैठकीत स्थानापन्न होत असे. मी देखील ह्या शिरस्त्याप्रमाणे आल्याबरोबर आधी गणपतीचे दर्शन घेतले. ग...